नांदेड People Poisoned By Drinking Water : नांदेड शहराजवळ असलेल्या नेरली कुष्ठधाम या गावात दोनशेहून अधिक जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिण्याच्या पाण्यामुळं ही विषबाधा झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलीय. तर विषबाधा झालेल्या नागरिकांना तातडीनं रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.
पिण्याच्या पाण्यातून झाली विषबाधा : गावातील सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीतील पाणी प्यायल्यानं गावकऱ्यांना उलट्यासह चक्कर आणि डोकेदुखी होऊ लागली. हळू-हळू हा त्रास वाढत गेला. मोठ्या संख्येनं रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं मिळेल त्या वाहनानं रुग्णांना शासकीय आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रात्रीतून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा झाली. आज (28 सप्टेंबर) सकाळपासून देखील अनेकांना असाच त्रास होत असल्याचं बघायला मिळतंय. त्यांची तपासणीकरुन उपचार सुरू करण्यात आले आहेत.
आरोग्य पथक तळ ठोकून : वाढत्या रुग्णसंख्येमुळं गावात आरोग्य पथक तळ ठोकून आहे. आलेल्या रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावर तत्काळ उपचार केले जात आहेत. तर जास्त त्रास असलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं जातंय. सार्वजानिक टाकीतील पाणी दूषित असल्यानं हा प्रकार घडल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. दरम्यान, आरोग्य विभागानं पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहे. सध्या पाणी पुरवठा बंद करण्यात आला असून टाकीची सफाई सुरु करण्यात आली आहे.
नालीचं दूषित पाणी मिसळल्यानं विषबाधा झाल्याची शक्यता : "नेरली ग्रामपंचायतीला जलशुद्धीकरणाचा प्रकल्प येऊन पडला आहे. मात्र मागील पाच वर्षापासून तो बंद अवस्थेत आहे. तर पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन देखील मोठ्या अवस्थेत फुटली आहे. नालीचं पाणी मिसळल्यानं दूषित पाणी नागरिकांच्या घरी पोहोचलं. त्यामुळे ही विषबाधा झाली. जलजीवन मिशनची कामं झाली नसूनही 2022 ला पूर्ण झाल्याचा बोर्ड लावण्यात आला आहे."
हेही वाचा -