गांधीनगर - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या भारत दौऱ्यामध्ये साबरमती आश्रमाला भेट देणार की नाही, हे व्हाईट हाऊस ठरवणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी ही माहिती दिली. ट्र्म्प हे २४ फेब्रुवारीपासून भारतात असणार आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून अशा चर्चा सुरू होत्या, की डोनाल्ड ट्रम्प हे साबरमती आश्रमाला भेट देणार नाहीत. महात्मा गांधींची ओळख असलेल्या या आश्रमाला ट्रम्प भेट देणार नसल्याचे समजताच विविध चर्चांना उधाण आले होते. त्यावर स्पष्टीकरण देत, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी आज याबाबत माहिती दिली.
यापूर्वी असे जाहीर करण्यात आले होते, की अहमदाबादच्या विमानतळावर उतरल्यानंतर ट्रम्प हे अहमदाबाद आश्रमाला भेट देतील. त्या ठिकाणी ते साधारणपणे तीस मिनिटे असणार आहेत.
ट्रम्प यांच्या स्वागतासाठीची तयारी जवळपास पूर्ण होत आली आहे. ते वॉशिग्टनहून थेट अहमदाबादला येतील. त्यानंतर एक मोठा रोड शो होणार आहे. त्यानंतर ते 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमासाठी मोतेरा स्टेडियमवर जातील, अशी माहितीही रुपानी यांनी दिली.
हेही वाचा : मध्यप्रदेशच्या आरोग्य कर्मचाऱ्यांवरील 'नसबंदी'चे संकट टळले