कोलकाता - देशामध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत चालले असून परिस्थिती गंभीर होत आहे. पश्चिम बंगालमधील एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात असलेल्या राज्य मंत्रिमंडळातील हे पहिलेच प्रकरण ठरले आहे.
राज्य अग्निशमन सेवामंत्री सुजित बोस यांच्या कोरोना चाचणीचा निकाल सकारात्मक आला आहे. त्यांना घरामध्ये क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्या निवास्थानी घरगुती कामात मदत करणाऱया व्यक्तीला कोरोनाची लागण असल्याचे समोर आल्यानंतर बोस यांच्या कुटुंबातील सदस्यांचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
गुरुवारी रात्री आलेल्या अहवालात बोस आणि त्याच्या कुटुंबातील एकाला विषाणूचा संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे.पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी सर्वांत जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 4 हजार 536 वर पोहचला आहे. तर राज्यात आतापर्यंत तब्बल 223 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.