कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला आता त्या व्यक्तीच्या मृतदेहाचे अंतिम दर्शन घेऊन त्यास श्रद्धांजली वाहता येणार आहे, अशी माहिती काल एका अधिसूचनेद्वारे देण्यात आली आहे. या पूर्वी ही मुभा मृतकाच्या कुटुंबीयांना देण्यात आलेली नव्हती.
अधिसूचनेत, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाला 30 मिनिटांकरिता एका सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावे. त्यानंतर कुटुंबाला या मृतदेहाचे दर्शन घेऊ द्यावे, असे सांगण्यात आले आहे. कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने एका तासाच्या आत मृत व्यक्तीच्या कुटुंबाला माहिती द्यावी. तसेच मृतकाच्या चेहऱ्यावर पारदर्शक कव्हर चढवावे, असेही अधिसूचनेत सांगण्यात आले आहे. मात्र, मृत व्यक्तीचा अंत्यसंस्कार हा नागरी अधिकाऱ्यांकडूनच करण्यात येणार असून मृत सदस्याचे अंत्यदर्शन घेताना कुटुंबाला संबंधित रुग्णालयाकडून मास्क आणि हातमोजे देण्यात येईल, असेही अधिसूचनेत सांगण्यात आले आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार आदराने होत नाही अशा तक्रारी समोर आल्या होत्या, त्यानंतर शुक्रवारी कोलकत्ता उच्च न्यायालयाने या आरोपांबद्दल राज्य सरकारकडे अहवाल मागितला होता. त्यानंतर, राज्य सरकारकडून मृत व्यक्तीचे अंत्यदर्शन घेण्याबद्दलची अधिसूचना काल जारी करण्यात आली आहे.