नवी दिल्ली - व्हॉट्सअॅपच्या हेरगिरीप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आपला फोन टॅप केल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे सर्व सरकारनेच घडवून आणले असल्याचं त्या म्हणाल्या.
इस्रायलच्या स्पायवेअर पिगाससच्या माध्यमातून भारतीय पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची हेरगिरी करण्यात आली असून त्यामध्ये माझा ही फोन टॅप केले असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. याबाबत माझ्याकडे पुरावे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा सर्व प्रकार सरकारला माहित आहे. सरकारने हे घडवून आणले आहे, असे त्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या.
काय आहे व्हॉट्सअॅप हेरगिरी प्रकरण?
इस्रायलच्या स्पायवेअर पिगासस भारतामध्ये सक्रिय होता. इस्राईलमधील एनएसओ ग्रुपने तंत्रज्ञानाचा वापर करत जगभरातील १ हजार ४०० लोकांच्या स्मार्टफोनला लक्ष्य केल्याचे व्हॉट्सअॅपने म्हटले आहे. यामध्ये राजकीय विरोधक, पत्रकार आणि सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, यामध्ये कोणत्या पत्रकार आणि कार्यकर्त्यांचा समावेश हे कंपनीने जाहीर केले नाही. भारत सरकारच्या माहिती व दूरसंचार मंत्रालयाने ४ नोव्हेंबरपर्यंत व्हॉट्सअॅपला याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.