नवी दिल्ली - चंद्रावर ज्या ठिकाणी आजपर्यंत कोणीही पोहोचले नाही, त्या ठिकाणी चांद्रयान-२ उतरणार आहे. आजपर्यंतचे सर्व टप्पे चांद्रयान-२ ने यशस्वीरित्या पार पाडले आहेत. त्यामुळे आजचा शेवटचा सॉफ्ट लँडिंगचा टप्पादेखील नक्कीच यशस्वीरित्या पार पाडू, असा विश्वास इस्रोचे प्रमुख के. सिवान यांनी आज व्यक्त केला. आम्ही सर्वांनी आमचे काम प्रामाणिकपणे आणि मेहनतीने केले आहे. आता आम्ही आज रात्री होणाऱ्या लँडिंगची आतुरतेने वाट पाहत आहोत. हा एक मोठा अविस्मरणीय क्षण असेल. सोबतच, पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आज इस्रोमध्ये उपस्थित असणार आहेत, असे ते म्हणाले.
भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम, चांद्रयान-२ काही तासांमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दीड ते अडीचच्या दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. या यशस्वी लँडिंगनंतर रशिया, अमेरिका आणि चीन या देशांनंतर चंद्रावर स्वतःचे यान उतरवणारा भारत चौथा देश ठरणार आहे. चांद्रयान-२ ची लॅडिंग पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील सुमारे ६०-७० विद्यार्थी बंगळुरुमधील इस्रो सेंटरमध्ये उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा : 'चांद्रयान-२'च्या लँडिंगलसाठी मोदी उत्सुक; क्षणाक्षणाला घेत आहेत माहिती
चांद्रयान-२ चे लँडिंग यानातील कमीतकमी आठ साधनांद्वारे पार पाडली जाणार असल्याचे इस्रोने सांगितले. विक्रम लँडरसोबत प्रज्ञान हे रोव्हर देण्यात आले असून, रात्री १:३० ते २:३० वाजण्याच्या दरम्यान विक्रम लँडर प्रज्ञान या रोव्हरला घेऊन चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. शनिवारी पहाटे ६:३० वाजण्याच्या सुमारास चांद्रयान पृष्ठभागावर उतरल्यानंतर विक्रमपासून रोव्हर वेगळे होईल, असेही के. सिवन यांनी सांगितले आहे.
चांद्रयान-२ ही इस्रोची दुसरी चांद्र मोहीम आहे. पहिल्या चांद्रयान मोहिमेत पाण्याचे रेणू सापडले होते. या मोहिमेत 'चंद्रावर क्षार, पाणी आहे का? कोणते वायू आहेत का? तेथे जीवनाची शक्यता आहे का? हे पडताळले जाणार आहे. चांद्रयान-२ च्या लँडिंगनंतर रोव्हरचा बाहेरचा कॅमेरा सुरू होईल. त्यानंतर तेथील छायाचित्रे मिळू शकतील. लँडिंगनंतर ५.८ तासांनी प्रत्यक्षात परीक्षणाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आहे.
हेही वाचा : Chandrayaan २ : 'चंद्र आहे साक्षीला'... इस्रो रचणार इतिहास!