पटना - भाजप आमदार राम कृपाल यादव हे बुधवारी शहरातील पूरस्थितीचा आढावा घेत होते. यावेळी ते तराफ्यावर उभे असताना, तराफ्याचे संतुलन बिघडल्याने ते पाण्यात पडल्याची घटना घडली. सुदैवाने यावेळी कोणालाही कोणतीही हानी झाली नाही.
बिहारला सध्या महापूराचा जोरदार तडाखा बसला आहे. याचा फटका जनसामान्यांसह नेत्यांनादेखील बसताना दिसत आहे. याआधी मंगळवारी बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडे यांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते. तसेच, राज्याचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सोमवारी एनडीआरएफ दलाच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते.
बिहारच्या पुरामध्ये आतापर्यंत ४२ लोक दगावल्याची माहिती मिळत आहे. तर राज्यात ठिकठिकाणी एनडीआरएफच्या पथकांमार्फत बचावकार्य सुरु आहे. भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून अन्न आणि मदत सामग्री देखील पोहोचवण्यात येत आहे.
हेही वाचा : निजामाच्या बँकेतील पैशांवर भारताचा हक्क; ७० वर्षांनी लागला निकाल