नवी दिल्ली - मृतदेह पुरल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात कोरोनाच संसर्गाचा धोका निर्माण होतो, असे म्हणत काही काळासाठी मृतदेह दफन करण्यावर बंदी असावी, अशी याचिका न्यायालयात दाखल झाली आहे. या याचिकेला विरोध करत वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मृतदेह दफन केल्याने कोरोनाचा धोका नाही, असे वक्फ बोर्डाने म्हटले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटनेने मृतदेह दफनबाबत नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार मृतदेह पुरल्याने कोरोनाचा धोका होतो यात त्यामुळे या दाव्यात काहीही तथ्य नाही. मृतदेह दफनविधी धार्मिक कारणांसाठी गरजेचे असल्याचे वक्फ बोर्डाने याचिकेत म्हटले आहे.
जमात-उलेमा-ए-हिंद, नवपाडा मस्जिद बांद्रा आणि सांताक्रुझ गोळीबार दर्गा ट्रस्ट या संस्थानीही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आरोग्य मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमावलीनुसार मृतदेह दफन केल्याने संसर्ग होत नाही, असे जमात-उलेमा-ए-हिंद या संघटनेने दाखल केलेल्या याचिकेतही म्हटले आहे.
hemorrhagic fever (हेमोर्रहेजीक फिवर) म्हणजेच रुग्णाची अशी अवस्था ज्यामध्ये रक्त वाहिन्या फुटून व्यक्तीचा मृत्यू होतो. त्या केसेसमध्ये मृतदेह संसर्गग्रस्त असतो. यामध्ये इबोला, मार्बर्ग, कॉलरा या आजारांचा समावेश होता. तसेच जर रुग्णाचे फुफसे संसर्गग्रस्त असतील आणि शवविच्छेदन नीट केले नाही, तर मृतदेहाद्वारे संसर्ग पसरू शकतो, इतर परिस्थितीत संसर्ग होत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
मृतदेह दफन करतेवेळी कोणती काळजी घ्यावी याबाबत सरकार आणि डब्ल्यूएचओने अनेक नियम घालून दिले आहेत. जसे की, मृतदेहाला स्पर्श करू नये, मास्क आणि ग्लोव्जचा वापर करावा. लहान बालके आणि वयोवृद्धांनी अंत्यसंस्कारास जाऊ नये. सामाजिक अंतर राखावे यासारखे नियम पाळले तर संसर्ग टाळता येऊ शकतो, असे नियमावलीत म्हटले आहे.