बंगळुरू - कर्नाटकात झालेल्या हिंसाचारात तिघांचा मृत्यू झाला असून 147 हून अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आमदार आकंदा श्रीनिवास मूर्ती यांच्या भावाच्या फेसबुक पोस्टवरून पुलकेशीनगरमध्ये जनसमुदायाचा भडका उडाला. यातूनच संबंधित हल्ला झाला असून त्याचे रुपांतरण हिंसाचारात झाले. विशिष्ट जातीच्या लोकांनी दगडफेक करून आमदारांच्या निवासस्थानाला आग लावली. यामध्ये अनेक गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.
जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच हवेत गोळीबारही करण्यात आलाय. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी अखेर पोलिसांना गोळीबार करावा लागला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून 10 जणांहून अधिक जखमी झाले आहेत.
110 हून अधिक आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अद्याप शंभरहून जास्त पोलीस या हिंसाचारात जखमी झाले आहेत. विवादास्पद फेसबुक पोस्ट शेअर करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आलीय.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बंगळुरू शहरात कलम 144 लागू करण्यात आले असून केजी हल्ली आणि डीजे हल्ली पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कडक कर्फ्यू लावण्यात आलाय.