पणजी - देशात समविचारी पक्ष भाजप विरोधात एकत्र येत आहे. तशी गोव्यातही हवा आहे. परंतु, प्रमुख विरोधी पक्षाचे काही लोक विकाऊ बनून सरकारच्या खिशात गेले आहेत. अशावेळी जनतेला न्याय मिळेल की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी टीका गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी केली.
सरदेसाई यांनी नुकतीच महाराष्ट्र सरकारच्या शपथविधी सोहळ्याला भेट देत गोव्यातही राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली होती. आज जुने गोवे येथे सेंट झेवियर फेस्टसाठी आले होते. महाराष्ट्रात केलेल्या वक्तव्याविषयी त्यांना प्रश्न विचारले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
आम्ही 2020 मध्ये जनतेचे सरकार आणू इच्छित आहोत, असे सांगून सरदेसाई म्हणाले, काँग्रेस विकाऊ झाल्याने विरोधक आहेत की नाही हे समजत नाही. अशा वेळी काँग्रेस नेतृत्वाने विचार केला पाहिजे की गोव्यात पक्ष राखायचा की दुकान बंद करायचे. काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष असूनही काँग्रेसचे काही नेते मात्र सरकारप्रमाणे भाषा बोलत असल्याची गोव्यात परिस्थिती असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला.
महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही बदल होऊ शकतो, असा विश्वास व्यक्त करत सत्ताधाऱ्यांच्या हातात अंतिम निर्णय नसून तो जनतेच्या हाती असल्याचा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री मनापासून गोमंतकीय नसल्यानेच सर्वाधिक बेरोजगारी असूनही त्यावर बोलत नसल्याचा आरोपदेखील त्यांनी केला.