नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राम जन्मभूमीचे 'ई-भूमीपूजन' करण्यात यावे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले होते. यावरुन आता विश्व हिंदू परिषदेने ठाकरेंचा निषेध केला आहे. ठाकरेंचे हे वक्तव्य म्हणजे एकेकाळी 'हिंदुत्ववादी' असणारा पक्ष संपत चालल्याचे लक्षण असल्याचे मत व्हीएचपीचे कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार यांनी व्यक्त केले आहे.
बाळासाहेब ठाकरेंनी उभारलेल्या हिंदुत्ववादी शिवसेनेकडून अशा प्रकारचे वक्तव्य येणे हे निंदनीय आहे. तसेच, उद्धव ठाकरे हे अंधपणे या गोष्टीला विरोध करत आहेत. कोणतेही बांधकाम सुरू करण्यापूर्वी आपण पृथ्वीमातेची परवानगी घेतो, जेणेकरुन ते बांधकाम चांगले होईल. अशाप्रकारची पूजा ही ऑनलाईन होऊ शकत नाही, असे कुमार म्हणाले.
भूमीपूजनाला २०० लोक राहतील उपस्थित..
देशात आता अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे मोठमोठ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता, या पूजेसाठी केवळ २०० लोकच उपस्थित राहतील अशी दक्षता आम्ही घेऊ, असे कुमार यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाने प्रतिकात्मक रथ यात्रेसाठी परवानगी दिली होती. तसेच, अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली असली तरी पूजेचे सर्व विधी पार पडणारच आहेत. त्यामुळे राम मंदिराचे भूमीपूजन करण्यालाही कोणाची काही हरकत नसावी. विश्व हिंदू परिषद ही पहिल्यापासून यासाठी खबरदारी बाळगत असतानाही, लोकांच्या आरोग्याचे कारण ठाकरेंनी पुढे केले आहे, जे नक्कीच खोटे आहे असे कुमार म्हणाले.
हेही वाचा : ठाकरेंना हिंदुत्वापेक्षा खुर्ची महत्त्वाची; चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका..