बंगळुरू (कर्नाटक) - कोरोनाच्या संकटाने सगळीकडे अनिश्चितता आहे. अशा परिस्थितीत कर्नाटक राज्यातील मंड्या शहरातील भाविकांने देवीला अनोख्या पद्धतीने साकडे घातले आहे. भाविकांनी देवीच्या मंदिरात फुलांची नव्हे फुलकोबीची सजावट केली आहे.
मंड्या शहरातील चामुंडेश्वरी देवीच्या गाभाऱ्याभोवती फुलकोबी आणि इतर भाज्यांच्या सजावटीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही सजावट करताना भाविकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शारीरिक अंतर आणि इतर नियमांचे पालन केले. कोरोनाचे संकट टळण्यासाठी मंदिरात चंद्रिका यज्ञ, गणपती होम, पंचामृत अभिषेक, रुद्राभिषेक व कुमकुमअर्चना करण्यात आल्याचे पुजाऱ्याने सांगितले.
भारतातील कोरोना रुग्णांची संख्या दहा लाखांहून अधिक झाली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. कर्नाटकमध्ये कोरोनामुळे 115 जणांचा मृत्यू झाला आहे. तर नवे 3 हजार 693 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. राज्यभरात एकूण 55 हजार 115 कोरोनाचे रुग्ण आढळल्याचे आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.
कर्नाटकमध्ये कोरोनाचे सर्वाधिक 2 हजार 208 कोरोनाबाधित बंगळुरुमध्ये आढळले आहेत. बंगळुरुमध्ये 20 हजार 623 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. असे असले तरी जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषाप्रमाणे कर्नाटकमध्ये दहा लाख लोकसंख्येमागे कोरोनाच्या जास्त चाचण्या होत असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांनी सांगितले.