नवी दिल्ली - वंदे भारत मिशनअंतर्गत, जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विविध देशांतील अनेक ठिकाणांहून भारतीय प्रवाशांना विमानाने आणण्यात आले. गुरुवारी रात्री कुवैत येथून 150 आणि युक्रेन येथून 143 भारतीय मायदेशी परतले आहेत.
विमानतळावर दाखल झालेल्या प्रत्येक प्रवाशाला 'आरोग्य सेतु' आणि 'राज कोविड अॅप' डाउनलोड करण्यास सांगितले आहे. विमानतळावरून बाहेर पडण्याआधी सर्व प्रवाशांच्या शारीरिक तापमानाची चाचणी झाली. तसेच, त्यांना कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक काळजी घेण्याविषयी सूचना दिल्या असून त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी बसेस द्वारे हॉटेलकडे पाठवण्यात आल्याचे उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ सुबोध अग्रवाल यांनी सांगितले.
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे भारतात रुग्ण आढळून आल्याने 22 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे अनेक नागरिक भारताबाहेर अडकले होते. अशा नागरिकाना भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने 'वंदे भारत मिशन' सुरू केले आहे. या मिशन अंतर्गत विमानाच्या माध्यमातून भारताबाहेरील नागरिकांना भारतात आणले जात आहे.