हैदराबाद (तेलंगाणा) - वंदे भारत मिशनअंतर्गत, हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी विविध देशांतील अनेक ठिकाणांहून भारतीय प्रवाशांना विमानाने आणण्यात आले.
एअर इंडिया एआय 1914 हे विमान 68 प्रवाशांसह जेडाहहून (सौदी अरेबिया) विजयवाडामार्गे रात्री उशिरा 12.24 ला हैदराबादला आले. एआय 174 हे एअर इंडियाचे दुसरे विमान 81 प्रवाशांसह सॅन फ्रान्सिस्कोहून (अमेरिका) बंगळुरुमार्गे काल दुपारी 12.16 च्या सुमारास हैदराबादमध्ये पोहोचले. एआय 1347 या एअर इंडियाच्या तिसऱ्या विमानाने सिंगापूरहून 149 प्रवाशी काल रात्री 8.35 ला हैदराबादला आले.
विमानतळावरून बाहेर पडण्याआधी सर्व प्रवाशांच्या शारीरिक तापमानाची चाचणी झाली. तसेच, त्यांना कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक काळजी घेण्याविषयी सूचना दिल्या.
नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंग पूरी यांनी वंदे भारत मिशनअंतर्गत आतापर्यंत 20 हजार भारतीयांना मायदेशी आणल्याची माहिती गुरुवारी दिली. येत्या काही दिवसांत आणखी भारतीयांना मायदेशी आणले जाईल, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.