चैन्नई - कोरोना महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाने सर्वात मोठे 'वंदे भारत मिशन' सुरू केले आहे. त्याअंतर्गत एअर इंडियाचे विमाने 177 भारतीयांना मलेशियातील क्वालालम्पूर येथून घेऊन आले आहे.
एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट IX0681 177 भारतीयांना घेऊन त्रिची आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. भारतात आणलेल्या नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. ज्या जिल्ह्यातील नागरिक असतील तेथे त्यांची क्वारंटाईनची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान मध्यपूर्वेतील ओमान आणि कुवैत या देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना घेऊन एअर इंडियाचे विमान आज कोची विमानतळावर दाखल झाले. तसचे बांगलादेशमध्ये अडकलेल्या ३५ भारतीयांना काल (शनिवार) विमानाने भारतात आणण्यात आले होते. उत्तरप्रदेशातील गाझीयाबाद येथे एअर इंडियाची फ्लाईट उतरली होती.
'वंदे भारत मिशन' ऑपरेशन अंतर्गत विविध देशांमध्ये ६४ विमानसेवा सुरू करण्यात आल्या आहेत. या मिशनच्या पहिल्या टप्प्यामध्ये १४ हजार ८०० नागरिकांना भारतात आणले जाणार आहे. ७ मे पासून हे मिशन सुरू करण्यात आले असून सर्व प्रवाशांकडून एका बाजूच्या प्रवाशाचे भाडे घेण्यात येणार आहे. सिंगापूर, न्युयॉर्क, कुवेत, दोहा, मस्कत, कुआलालम्पूर, शारजाह या देशातही काल एअर इंडियांची विमाने गेली होती.