शिमला - देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहे. समाजातील अनेक व्यक्ती आपापल्यापरीने प्रशासनाला मदत करत आहेत. भोरंज तालुक्यात येणाऱ्या निचला करहा या गावातील एक ११ वर्षीय चिमुरडी प्रशासनाच्या मदतीला धावून आली आहे. ती स्वत: मास्क शिवण्याचे काम करत आहे.
वैष्णवी शर्मा असे नाव असलेली ही मुलगी इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे. वैष्णवी आपल्या आईसह मिळून कोरोनासाठी संरक्षक मास्क तयार करते. काही दिवसांपूर्वी भोरंजच्या आमदार मास्क शिवत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. तो व्हिडिओ पाहून वैष्णवीला मास्क तयार करण्याची कल्पना सुचली.
वैष्णवी शर्मा सारखे लहानगी मुले प्रशासनाला आपापल्यापरीने मदत करत आहेत. मात्र, काही लोक लॉकडाऊनमधील संचारबंदीचे उल्लंघन करून पोलिसांचे आणि प्रशासनाचे काम वाढवत आहेत. वैष्णवीसारखी मुले या असा समाजविघातक लोकांसाठी उदाहरण घालून देत आहेत.