देहराडून - बलात्कार झाल्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर मुलीवर योग्य उपचार न करताच डिस्चार्ज देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकेच नाही तर, यानंतर आरोपींसोबत पोलिसांच्या वाहनातून घाईगडबडीत जबाब नोंदवण्यासाठी घेवून गेल्याचा आरोप बलात्कार पीडितेच्या पालकांनी केला आहे.
नायबाग परिसर, तेहरी जिल्हा उत्तराखंड येथे ३० मे रोजी ९ वर्षीय मुलीवर बलात्कार झाला होता. यानंतर, पीडितेला डुन वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी तिच्यावर संपूर्ण उपचार न करताच डिस्चार्ज देण्यात आला. अशा स्थितीतच तिला पोलिसांच्या वाहनातून आरोपींसोबत ४ तास प्रवास करत जबाब नोंदवण्यासाठी नेण्यात आले. यामुळे तिची तब्येत बिघडल्यामुळे तिला व्यवस्थितरित्या जबाबही नोंदवता आला नाही.
या प्रकरणाची माहिती मिळताच उत्तराखंडच्या बालविकास मंत्री रेखा आर्या यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले. आर्या म्हणाल्या, आम्ही डॉक्टरांचा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. यासोबतच दोषी पोलिसांवरही कारवाई करण्यात येणार आहे. आम्ही पीडितेला आधार देण्यासाठी आणि तिला शारीरिक आणि मानसिकरित्या ठीक करण्यासाठी समुपदेशकाला नियुक्त केले आहे. यासोबत आम्ही पीडितेला ७ लाखांची मदतही जाहीर करत आहोत.