देहराडून : पतंजलीने 'कोरोनावरील औषध' म्हणून समोर आणलेल्या कोरोनीलसमोरील अडचणी वाढतच जात आहेत. आयुष मंत्रालायने फटकारल्यानंतर, आता उत्तराखंड आयुर्वेद विभागानेही या औषधाच्या दाव्याबाबत आपले हात वर केले आहेत. तसेच, विभागाचे परवाना अधिकारी वाय. एस. रावत यांनी आपण कंपनीला यासंदर्भात नोटीस पाठवणार असल्याचेही सांगितले आहे.
पतंजलीने आपल्या औषधाच्या उत्पादनासाठी आमच्याकडे अर्ज केला होता. त्यानुसार आम्ही त्यांना परवानगी दिली, त्यानंतर त्यांनी उत्पादन सुरू केले हे खरे आहे. मात्र, त्यांनी दाखल केलेल्या अर्जामध्ये कोरोना किंवा कोविड-१९चा कोठेही उल्लेख नव्हता. केवळ रोगप्रतिकार शक्ती वाढवणे, तसेच खोकला आणि तापावर औषध असा या अर्जात उल्लेख होता, त्यामुळे आम्ही परवानगी दिल्याचे रावत यांनी स्पष्ट केले. त्यामुळेच, 'कोरोनील किट' बनवण्याची परवानगी त्यांनाकशी मिळाली, हे विचारणारी नोटीस आम्ही त्यांना पाठवणार आहे, असेही रावत यांनी सांगितले.
पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जयपूर यांनी संयुक्तपणे 'दिव्य कोरोनील' या औषधाची निर्मिती केली आहे. या औषधाच्या जयपूर आणि इंदूरमध्ये झालेल्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये १००टक्के यश मिळाल्याचे पतंजलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बालाकृष्णा यांनी म्हटले होते. कोरोनीलच्या वापराने कोरोनाचा रुग्ण साधारणपणे ५ ते १४ दिवसांमध्ये बरा होऊ शकतो, असा दावाही त्यांनी केला होता.
मात्र, या दाव्यावर आयुष मंत्रालयाने आक्षेप घेतला होता. अशा प्रकारचा दावा करणे हे हे ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज (आक्षेपार्ह जाहीराती) कायदा, १९५४; आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमांनुसार बेकायदेशीर आहे. त्यामुळे याबाबत केलेल्या संशोधनाची माहिती, आणि चाचण्यांचा अहवाल सादर करण्याचा आदेश आयुष मंत्रालयाकडून कंपनीला देण्यात आला होता.
हेही वाचा : पतंजलीने 'कोरोनिल'बाबत सर्व पुरावे आयुष मंत्रालयाला पाठवले