लखनऊ - उत्तर प्रदेशच्या फारुखाबादमध्ये एक चीड आणणारी घटना घडली आहे. दारू पिण्यासाठी पैसे आणि दागिने देत नसल्यामुळे एका व्यक्तीने त्याच्या पत्नीचा खून केला आहे. जिल्ह्याच्या बार्मुलिया गावामध्ये ही घटना घडली. याप्रकरणी नवाबगंज प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पळून गेलेल्या खुन्याचा तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत असे या नराधमाचे नाव आहे. सहा वर्षांपूर्वी त्याचा लक्ष्मी देवीसह विवाह झाला होता. या जोडप्याला पाच वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांची मुलगीही होती. प्रशांत हा दारुडा असल्याने नेहमी दारू पिऊन पत्नीला मारहाण करत असे. तसेच, दारूसाठी तो सतत तिला पैसे मागत असे. यावेळी तिने पैसे देण्यास नकार दिल्यावर त्याने तिच्याकडील दागिन्यांची मागणी केली, जेणेकरून ते विकून त्याला पैसे मिळतील.
मात्र, तिने तसे करण्यास नकार दिल्यामुळे चिडून त्याने तिला काठीने जबर मारहाण केली. त्यानंतर तिचे सोन्याचे कानातले घेऊन तो पळून गेला. त्यानंतर अधिक रक्तस्त्राव झाल्यामुले लक्ष्मीचा मृत्यू झाला. तिच्या आई-वडिलांनी याबाबतची तक्रार दाखल केली आहे. नवाबगंजचे स्टेशन हाऊस ऑफिसर राकेश कुमार शर्मा यांनी याबाबत माहिती दिली.
हेही वाचा : पैसे देण्यास नकार देणाऱ्या जन्मदात्रीची तरुणाकडून हत्या.. मध्यप्रदेशमधील घटना