कॅरी (अमेरिका) - कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईडच्या अन्यायकारक मृत्यूनंतर अमेरिकेमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. कॅरी शहरातील उत्तर कॅरोलिना भागात ख्रिश्चन धर्मगुरुंच्या उपस्थितीमध्ये प्रार्थना आणि पदयात्रा काढली होती. पदयात्रेच्या समारोपावेळी संबंधीत भागातील पोलिसांनी आंदोलक आणि ख्रिश्चन धर्मगुरूंचे पाय धुवून नमस्कार केला. या प्रसंगाला कॅरीचे हंगामी महापौर लोरी बुश यांनी ट्वीट करून दुजोरा दिला आहे. हा एक मार्मिक क्षण असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.
इतरांचे पाय धुणे हे ख्रिश्चन धर्मामध्ये माणूसकीची उपासना असल्याचे सांंगितलेे आहे. त्यामुळे पोलिसांनी गुडघ्यावर बसून धर्मगुरुंचे पाय धुतले.
"मला श्वास घेता येत नाही, कृपया माझा जीव घेऊ नका"
जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा माईनपोलीस याठिकाणी मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत मोर्चे सुरू झाले आहेत. जॉर्जला अटक करत असताना, एक पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या मानेवर 8 मिनिटे 48 सेंकद गुडघा ठेवला होता. जॉर्ज त्याला तो गुडघा काढण्यासाठी आर्जव करीत होता, "मला श्वास घेता येत नाही, कृपया माझा जीव घेऊ नका," असे जॉर्ज म्हणत होता. मात्र, पोलिसाने त्याच्या विनवण्या ऐकल्या नाहीत, आणि जॉर्जचा मृत्यू झाला.