वॉशिंग्टन- अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडन यांनी एरिजोना आणि जॉर्जिया राज्यातही विजय मिळवला आहे. शुक्रवारी यासंबंधीत घोषणा करण्यात आली. अमेरिका निवडणुकीत डेमोक्रेट पक्षाला ३०६ इलेक्टोरल मत मिळाले आहेत. तर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना २३२ मत मिळाले आहेत. ट्रम्प यांनी नॉर्थ कॅरोलिना राज्यात विजय मिळवला.
जॉर्जियातील विजयानंतर बायडन यांना मिळालेल्या मतांमध्ये १६ इलेक्टोरल मतांची वाढ झाली आहे. यासह बायडन यांच्या एकूण इलेक्टोरल मतांची संख्या ३०६ झाली आहे.
२०१६ ट्रम्प झाले होते विजयी -
२०१६ च्या अमेरिका अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना ३०६ मत मिळाले होते. तर, त्यावेळच्या डेमोक्रेट पक्षाच्या उमेदवार हिलेरी क्लिंटन यांना २३२ मत मिळाले होते. या निवडणुकीत ट्रम्प यांनी जॉर्जिला, एरिजोना, मिशिगन, पेनसेल्विया आणि विंस्कोन्सिनमध्ये विजय मिळवला होता.
बिल क्लिंटननंतर पहिले डेमोक्रेट पक्षाचे उमेदवार -
बिल क्लिंटननंतर जो बायडन पहिले असे डेमोक्रेट पक्षाचे उमेदवार आहेत, ज्यांनी जॉर्जियातून निवडणूक जिंकली. १९९२ मध्ये बिल क्लिंटन यांनी जॉर्जियात निवडणूक जिंकली होती. मिळालेल्या माहितीनुसार, बायडेन यांनी १४ हजार मतांनी ही निवडणूक जिंकली. बायडेन डोनाल्ड ट्रम्प यांना हरवून अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष झाले आहेत. डेमॉक्रॉटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत अखेर बायडेन यांना अमेरिकी नागरिकांनी कौल दिला. जो बायडन अध्यक्ष तर कमला हॅरिस यांनी उपाध्यक्षपदाची निवडणूक जिंकली.
जो बायडन हे आतापर्यंतचे सर्वाधिक मतं मिळवणारे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार -
जो बायडन हे आतापर्यंतचे सर्वाधिक मतं मिळवणारे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार ठरले आहेत. यापूर्वी हा विक्रम माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या नावावर होता. बायडेन यांना ७ कोटी, ३४ लाख, ८१ हजार, ४८२ मतं मिळाली आहेत. जी इतिहासातील कोणत्याही अध्यक्षपदाच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांपेक्षा अधिक आहेत. यापूर्वी ओबामा यांना मिळालेल्या मतांपेक्षाही सुमारे साडेतीन लाख मतांनी बायडेन पुढे आहेत. ओबामा यांना २००८ मध्ये ६ कोटी, ९४ लाख, ९८ हजार, ५१६ मतं मिळाली होती.
हेही वाचा - अमेरिकेत सत्तापालट : 'या' कारणांमुळे झाला ट्रम्प यांचा पराभव
कोण आहेत बायडेन?
जो बायडेन म्हणजेच जोसेफ रॉबिनेट बायडेन ज्युनियर यांचा जन्म 1942 मध्ये पेनसिल्व्हानियामधील स्क्रॅन्टन येथे झाला. त्यांचे बालपण डेलावेअर राज्यात गेले. जो बायडेन यांनी राजकारणात येण्यापूर्वी काही दिवस वकील म्हणून काम केले आहे. ते इतिहासातील पाचवे सर्वात तरुण अमेरिकन सिनेटचे सदस्य ठरले. तसेच, सर्वात जास्त काळ डेलावेअरमधील सिनेटचे सदस्य म्हणून काम करत आहे.
बायडेन यांनी यापूर्वीच अध्यक्षीय निवडणुकीच्या शर्यतीत प्रवेश केला होता
डेलावेअर येथील सहा वेळा सिनेटचे सदस्य असलेले बायडेन तिसऱ्यांदा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत उतरले आहेत. 1988 च्या निवडणुकीत त्यांनी प्रथम प्रयत्न केला. मात्र, तेव्हा त्यांना साहित्यिक चोरीच्या आरोपामुळे मागे हटावे लागले होते. त्यानंतर 2008 च्या निवडणुकीत त्यांनी दुसरा प्रयत्न केला.
बायडेन हे अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचे निकटवर्तीय असल्याचे म्हटले जाते. 2008 ते 2016 या काळात ओबामा यांच्या कार्यकाळात त्यांनी दोनदा उपराष्ट्राध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांना माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचाही पाठिंबा होता.
2017 मध्ये ओबामा यांनी जो बायडेन यांना त्यांच्या प्रशासनासाठी अध्यक्षपदासाठी सादर केले. दोन वर्षांनंतर, बायडेन यांनी आपल्या अध्यक्षीय प्रचारास प्रारंभ केला आणि 2020 मध्ये ते डेमॉक्रेटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार बनले होते.
कौटुंबिक अडचणींशी झुंज देत बायडेन या टप्प्यावर पोहोचले
1972 मध्ये बायडेन हे सिनेटसाठी निवडले गेलेल्या सर्वांत तरुण लोकांपैकी एक होते. काही आठवड्यांनंतर, बायडेन यांच्या कुटुंबात एक शोकपूर्ण घटना घडली। जेव्हा त्यांची पत्नी नीलिया आणि मुलगी नाओमी एका कार अपघातात ठार झाल्या आणि त्यांचे मुलगे हंटर आणि बीओ गंभीर जखमी झाले.
बायडेन आपल्या मुलांना पाहण्यासाठी विल्मिंगटन आणि वॉशिंग्टन डी.सी. दरम्यान दररोज अॅमट्रॅक ट्रेनने प्रवास करीत. त्यानंतर ते 'अॅमट्रॅक जो' या नावाने प्रसिद्ध झाले. पाच वर्षे बायडेन यांनी बहीण वेलेरी आणि त्यांच्या कुटुंबाच्या मदतीने बीओ आणि हंटर यांना वडील म्हणून एकट्याने (एकेरी पालक) वाढवले.
2015 मध्ये, बायडेन यांचा मोठा मुलगा बीओ यांचे वयाच्या 46 व्या वर्षी ब्रेन कॅन्सरमुळे निधन झाले. बायडेनचा लहान मुलगा हंटरबद्दल बोलायचे तर, वकील आणि लॉबीस्ट म्हणून त्यांची कारकीर्द भ्रष्टाचाराच्या आरोपांचे लक्ष्य ठरली आहे. पत्नी नीलियाच्या मृत्यूच्या पाच वर्षानंतर बायडेन यांनी जिलशी लग्न केले. त्यांना अॅशले नावाची एक मुलगी आहे. तिचा 1981 मध्ये जन्म झाला.
बायडेन यांचे प्राधान्यक्रम काय आहेत?
बायडेनला तीन प्रमुख प्राधान्यक्रम आहेत. यात आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधांचा विस्तार करणे, शिक्षणात अधिक गुंतवणूक करणे आणि भागीदार देशांशी संबंध परत चांगल्या प्रकारे प्रस्थापित करणे यांचा समावेश आहे..
बायडेन यांचे भारताबद्दल काय मत आहे?
भारताच्या 74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारतीय-अमेरिकन समुदायाला संबोधित करताना बायडेन म्हणाले की, जर त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली तर, भारताला भेडसावणाऱ्या धोक्यांशी सामना करण्यासाठी ते भारताच्या बाजूने उभे राहतील.
बायडेन म्हणाले की, '15 वर्षांपूर्वी मी भारताबरोबर ऐतिहासिक नागरी अणुकरार मंजूर करण्याच्या प्रयत्नाचे नेतृत्व करीत होतो. मी म्हटले होते की, भारत आणि अमेरिका जवळचे मित्र आणि सहयोगी बनले तर जग अधिक सुरक्षित होईल.' ते असेही म्हणाले की, ते दोन्ही देशांमधील व्यापार वाढविण्यावर आणि हवामान बदलांसारख्या जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी काम करतील.
हेही वाचा - US election 2020: जो बायडेन यांची राजकीय कारकीर्द आणि संघर्षाची कहाणी