वॉशिंग्टन - जगभरामध्ये कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. चीनमध्ये सर्वात प्रथम आढळलेला विषाणू आता वेगाने जगातील विविध देशांमध्ये पसरला आहे. त्यामुळे कोरोनाचा सामना करण्यासाठी अमेरिकेने भारताला 29 लाख डॉलर्स (21.7 कोटी रुपये) मदत जाहीर केली आहे.
कोरोना महामारीवर मात करण्यासाठी अमेरिकेकडून जगातील 64 देशांना 174 दशलक्ष डॉलर्सची (1300 कोटी रूपये) आर्थिक मदत करण्यात आली आहे. या 64 देशांच्या यादीमध्येही भारताचाही समावेस असून भारताला 29 लाख डॉलर्स (21.7 कोटी रूपये) दिले जाणार आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पेओ यांनी ही घोषणा केली आहे.
जगभरामध्ये कोरोनाचा प्रसार होत असल्याने विविध आर्थिक क्षेत्रांवरही परिणाम होत आहे. पर्यटन, व्यापार, वैद्यकीय क्षेत्र, औषधे, प्रवासी वाहतूक, कच्चा तसेच तयार मालाचा पुरवठा कमी झाला आहे. गरीब देशांना कोरोनाचा सामना करणे शक्य होणार नाही.
दरम्यान जगात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या अमेरिकेत झाली असून चीनलाही टाकले मागे. 2 हजार 227 जणांचा अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 18 हजार 292 जणांवर उपचार सुरू आहेत. अमेरिकेत आता जगातील सर्वात जास्त कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाशी सामना करण्यासाठी अमेरिकन प्रशासनाने तयारी वाढविली आहे.