वॉशिंग्टन डी. सी - मुंबईमध्ये 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा यास जामीन देण्यास अमेरिकेतील न्यायालयाने नकार दिला आहे. 15 लाख अमेरिकी डॉलरच्या बदल्यात जामीन मिळण्यासाठी राणाने न्यायालयात अर्ज सादर केला होता. मात्र, खटला पूर्ण होण्याच्या आत राणा देश सोडून पळून जाण्याची शक्यता असल्याने न्यायालयाने जामीन अर्ज नाकारला. राणा हा मुळचा पाकिस्तानी असून कॅनडातील व्यावयायिक आहे. भारताने त्याला मुंबई हल्ल्याप्रकरणी फरारी घोषित केले आहे.
मुंबईमध्ये 2008 साली 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 166 जणांना प्राण गमवावे लागले होते. यात 6 अमेरिकेच्या नागरिकांचाही समावेश होता. या हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडली याचा राणा लहानपणीचा मित्र आहे. मागील महिन्यात 10 जूनला भारताच्या विनंतीनुसार राणाला लॉस एन्जल्स येथून अटक करण्यात आले होते. त्याने स्थानिक न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायाधीश जॅकलिन चोलजॅन यांना त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. जर जामीन मिळाला तर तहव्वूर राणा देश सोडून कॅनडात पळून जाण्याची शक्यता आहे. तसेच जर प्रत्यार्पण करण्यात आले तर भारताद्वारे त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देता येणार नाही, असे सरकारी वकीलांनी न्यायालयात युक्तीवाद केला.
राणाला जामीन मिळाला तर त्याचा अमेरिका आणि भारताच्या राजनैतिक संबंधावर परिणाम होऊ शकतो, असे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. मात्र, तहव्वूर राणा देश सोडून पऴून जाणार नाही. यासाठी 15 लाख अमरिेकी डॉलरचा बॉन्ड देण्यात येत आहे, असे राणाच्या वकिलांनी सांगितले. अमेरिकेनेे डेव्हिड हेडलीला भारताच्या ताब्यात देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे माझे भारताकडे प्रत्यार्पण करण्याचा निर्णय विसंगत असल्याचे राणाने न्यायालयात सांगितले.
खून आणि कट रचल्याप्रकरणी जर गुन्हा दाखल असेल तर प्रत्यार्पण टाळण्यासाठी आरोपी देश सोडून जाण्याची शक्यता जास्त आहे, असे म्हणत न्यायालयाने जामीन नाकारला. तसेच भारत आणि कॅनडादम्यान जो प्रत्यार्पण कायदा आहे. त्यामध्ये जर आरोपी दोषी आढळल्यानंतर मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची तरतूद असेल तर कॅनडा प्रत्यार्पण करण्यास नकार देऊ शकतो. तसेच आरोपीला मृत्यूदंडाच्या शिक्षेपासून सुट मिळू शकते, असे सरकारी वकिलांनी सांगितले.