लखनऊ - अपघातात जखमी झालेल्या एका व्यक्तीला चक्क मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात टाके घातल्याची घटना घडली आहे. फिरोजाबादमधील शिकोहाबादच्या एका सरकारी दवाखान्यात हा प्रकार घडला आहे.
मनोज कुमार यांच्या वडिलांचा अपघात झाला होता. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वडिलांना जेव्हा दवाखान्यात नेण्यात आले, तेव्हा तिथे डॉक्टरदेखील उपस्थित नव्हते. त्यानंतर, जेव्हा डॉक्टर आले तेव्हा दवाखान्यात वीजही नसल्यामुळे मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात त्यांच्या वडिलांवर उपचार करण्यात आले.
मनोज यांच्या वडिलांना डोक्याला मार लागला होता. त्यांना टाके घालत असताना दवाखान्यातील एक कर्मचारी बाजूला मोबाईल घेऊन उभा होता. या मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात त्यांना टाके घातले गेले.
यावेळी उपस्थित असलेले डॉ. अभिमन्यू यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी त्यांची अपरिहार्यता व्यक्त केली. दवाखान्यात वीज नव्हती आणि कदाचित दवाखान्यातील इनव्हर्टरही बंद होता. मात्र, जखमीवर तातडीने उपचार होणे आवश्यक होते म्हणून हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच, याबाबत मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती देण्यात येणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : शिक्षकानं पुरवला बायकोचा हट्ट; पत्नीसाठी गावात बोलावलं हेलिकॉप्टर