लखनऊ : उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये काही व्यक्ती एका वृद्धाला खाटेवर उचलून रुग्णालयात नेताना दिसत आहेत. पाण्याने भरलेल्या रानातून वाट काढत या वृद्धाला हे लोक घेऊन जात आहेत. यामुळे देशातील रस्ते आणि आरोग्य सुविधांचा कसा बोजवारा उडाला आहे, हेच दिसून येते.
गोविंद धार दुबे हे लष्करात कार्यरत आहेत. सुट्ट्यांसाठी ते आपल्या गावाला आले होेते. तेथे त्यांच्या आजोबांची प्रकृती ढासळली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. मात्र गावात रस्ताच नसल्याने, त्यांनी आपल्या आजोबांना इतर गावकऱ्यांच्या मदतीने चक्क खाटेवरुन दवाखान्यात नेले. यासाठी ते तब्बल दीड किलोमीटर, गुडघाभर पाणी असलेल्या रानातून चालत गेले. त्यानंतर लखनऊच्या कमांड रुग्णालयात आजोबांवर उपचार केल्यानंतर तसेच खाटेवरुन परत नेण्यात आले.
आमच्या घरापासून दोन किलोमीटरपर्यंत रस्ता नाही. तसेच, मुख्य रस्ताही पावसाळ्यात बराच काळ पाण्याखाली असतो. आम्ही या सर्व प्रकाराचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर यासाठी टाकला, कारण त्यानंतर तरी प्रशासनाचे आमच्याकडे लक्ष जाईल, असे गोविंद यांनी सांगितले.
ईटीव्ही भारतने यासंदर्भात गोंडाचे मुख्य विकास अधिकारी शशांक त्रिपाठी यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी या प्रकरणाची चौकशी करुन, संबंधित बीडीओ आणि ग्राम पंचायतीशी संपर्क साधणार असल्याचे सांगितले. जेणेकरुन भविष्यात अशा प्रकारच्या समस्या पुन्हा उद्भवणार नाहीत.
हेही वाचा : तृतीयपंथींसाठी राजस्थान सरकारचा मोठा निर्णय; दोन टक्के जमीन राहणार आरक्षित...