नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज करावल नगर येथील प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकस्त्र सोडले. केजरीवाल यांचे समर्थन पाकिस्तानचे काही मंत्री करत असून हे लज्जास्पद आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
पाकिस्तान केजरीवाल यांना समर्थन देत आहे. दिल्लीवाले केजरीवाल यांना समर्थन देत नाहीत. अशावेळी पाकिस्तान केजरीवाल यांना समर्थन देत आहे. जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यामुळे केजरीवाल यांना त्रास होत आहे, असेआदित्यनाथ म्हणाले.
आम आदमी पक्ष खोटी नारे लावत असून संपूर्ण व्यवस्था बिघडवत आहेत. तसेच नक्षलवाद्यांसोबत मिळून सुरक्षेचा भंग करत आहेत. आम आदमी पक्षाला दिल्लीच्या विकासाशी काहीच देणेघेणे नाही, असेही आदित्यनाथ म्हणाले.
दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या 8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडेल. तर, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी दिली. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत तत्काळ प्रभावी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.