लखनऊ - उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर याचे विधानसभा सदस्यत्व रद्द झाले आहे. उन्नाव जिल्ह्यातील बांगरमऊ मतदारसंघाचे तो प्रतिनिधित्व करत होता. २० डिसेंबर २०१९ पासून ही जागा रिक्त असल्याचे उत्तर प्रदेश विधानसभा सचिवालयाने घोषित केले आहे.
बहुचर्चित उन्नाव बलात्कार खटल्याप्रकरणी दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने २० डिसेंबर २०१९ मध्ये भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याबरोबरच पीडितेला २५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते. या शिक्षेला सेंगरने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
हेही वाचा - LIVE: दिल्ली हिंसाचार: पोलीस शिपायासह ७ जणांचा मृत्यू; काही भागांत महिनाभर संचारबंदी
काय आहे प्रकरण?
जून २०१७ मध्ये नोकरी मागण्यास गेल्यावर कुलदीप सेंगर याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला होता. तक्रार दाखल केल्यानंतर सेंगर आणि त्याच्या माणसांकडून पीडितेच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे पीडितेने सांगितले होते. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांच्या गाडीचा अपघात झाला होता. यात पीडितेच्या काकू आणि मावशीचा जागीच मृत्यू झाला. यापैकी पीडितेची काकू ही या प्रकरणातील मुख्य साक्षीदार होती. हा अपघात सेंगरनेच घडवून आणल्याचा आरोप पीडितेच्या आईने केला होता. खटल्यात सीबीआयने कुलदीप सेंगर, त्याचा ड्रायव्हर आणि इतर सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता.