भुवनेश्वर - ओडिशातील तमनपल्ली गावात एका अज्ञात आजारामुळे आतापर्यंत सहा लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत्यू गेल्या १५ दिवसांच्या दरम्यान झाले आहेत. त्यामुळे, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा आजार झालेल्या मुलांना सर्दी, ताप, उलट्या आणि अपचनासारखी लक्षणे दिसून येत होती. आतापर्यंत सहा मुलांचा बळी घेतलेल्या या आजाराची लक्षणे, परिसरातील आणखी सात मुलांमध्येही दिसून येत आहेत. या सर्व मुलांना कालिमेला सार्वजनिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करुन घेण्यात आले आहे.
या आजाराबाबत आणखी माहिती मिळवण्यासाठी कालिमेला रूग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक जवळच्या गावांमध्ये जाऊन तपासणी करुन आले आहे. तसेच, जिल्हा प्रशासनाने गावामध्ये लसीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
२०१६ मध्ये अशाच प्रकारे पसरलेल्या 'जपानी एन्सेफलायटीस' या आजाराने १०५ मुलांचा मृत्यू झाला होता. आताच्या घटनेमुळे तेव्हाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत, तसेच लोकांमध्ये भीती पसरली आहे.
हेही वाचा : आंध्रामधील अपघातात ३० जनावरांचा दुर्दैवी मृत्यू, १० जखमी..