नवी दिल्ली - रोहित शेखरची पत्नी अपूर्वा शुक्ला-तिवारी त्याच्याशी झालेल्या विवाहाने नाखूश होती. रोहित दारू प्यायलेल्या अवस्थेत असताना तिनेच उशीच्या सहाय्याने गुदमरवून मारले, असे अपूर्वा हिला बुधवारी अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने सांगितले.
३ दिवस कसून चौकशी केल्यानंतर आज अपूर्वाला अटक करण्यात आली. तिला दिल्लीच्या साकेत जिल्हा न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शेखरच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अपूर्वाला एक महिला कर्मचारी आणि दुसऱ्या कर्मचाऱ्यासह अज्ञात स्थळी नेले होते.
भारतीय दंड विधानानुसार सेक्शन ३०२ खाली अपूर्वावर खूनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालात रोहितचा मृत्यू नैसर्गिक नसून गळा दाबल्याने किंवा गुदमरल्याने झाला असल्याचे स्पष्ट झाले होते.
रोहित १५ एप्रिलच्या रात्री झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४ वाजता गूढरीत्या मृत आढळले होते. मात्र, इतका वेळ त्यांना झोपेतून उठवण्यास कोणीही गेले नाही, हे धक्कादायक आहे.
तिवारी यांच्या नोकरांचा जबाब आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज यांच्या आधारे 'रोहित सरळ घरात आले. त्यानंतर स्वत:च्या खोलीत निघून गेले आणि झोपले' असे दिसत आहे. सूत्रांनुसार, रोहित यांचे मुख्य नोकर भूपेंद्र यांची अनेकदा चौकशी करण्यात आली. आतापर्यंत त्यांच्या तिन्ही नोकरांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.