लखनऊ - भरधाव वेगाने जाणाऱ्या एका बोलेरो गाडीचा अपघात होऊन पाचजणांचा मृत्यू झाला. प्रतापगडच्या कंधई पोलीस ठाण्याजवळ असलेल्या पिपरी खालसा घाटात हा अपघात झाला. वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी झाडाला जाऊन आदळली. सर्व मृत एकाच गावच्या रहिवासी असून एक लग्न समारंभ आटोपून ते घरी परत जात होते.
मृतात एका जवानाचा समावेश -
या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. यात एका जवानाचाही समावेश आहे. जवान असलेल्या संदीप यादव यांचा रविवारी साखरपुडा झाला होता. त्यानंतर आपल्या भावाच्या लग्नासाठी ते कुंदनपुरला गेले होते. वरातीत सहभागी झाल्यानंतर संदीप यादव, राहुल, अखिलेश, पप्पू आणि आणखी एक व्यक्ती घरी परत येत होते. याच वेळी त्यांचा अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पूर्वी सुरेंद्र द्विवेदी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी बोलेरो गाडी कापून सर्वांना बाहेर काढले व रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.