नवी दिल्ली - ईव्हीएममध्ये फेरफार होण्याची शक्यता असल्याचा मुद्दा विरोधी पक्ष उचलत असताना काँग्रेस नेते डॉ. उदित राज यांनी सर्वोच्च न्यायालयावरच शंका घेतली आहे.
व्हीव्हीपॅटच्या सर्वच स्लीप मोजण्यासाठी सर्वोच्च न्यायालय अनुमती देत नाही. न्यायालयही ईव्हीएममध्ये फेरफार करण्यात सामील आहे का, असा सवाल डॉ. उदित राज यांनी उपस्थित केला आहे. व्हीव्हीपॅटच्या स्लीप मोजण्यासाठी वेळ लागणार असल्याचे कारण सांगून, असे करणे टाळले जात आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे तीन महिने लागले आहेत. मतमोजणीसाठी आणखी दोन-तीन महिने लागले तर काय फरक पडेल, असे ट्विट उदित राज यांनी केले आहे.
विरोधी पक्षांनी ५० टक्के व्हीव्हीपॅट स्लीपची पडताळणी ईव्हीएममशीनसोबत करावी अशी मागणी केली आहे. या मुद्द्यावर निवडणूक आयोगाची बैठक सुरू आहे. यादरम्यान निवडणूक आयोगाबाहेर विरोधी पक्ष आंदोलन करत आहेत. या मुद्द्यावर निवडणूक आयोग आज निकाल देण्याची शक्यता आहे.