श्रीनगर - (जम्मू आणि काश्मीर) उत्तर काश्मीरमधील दोन रहिवाशांना अटक केल्याचा पाकिस्तान पोलिसांनी दावा केला आहे. हेरगिरीतून त्यांना अटक केल्याचे पाकिस्तानी पोलिसांनी म्हटले आहे.
पाकिस्तानमध्ये अटकेत असलेल्या तरुणांची नूर मोहम्मद वाणी आणि फिरोज अहमद लोन ही नावे आहेत. ते बांदीपूर जिल्ह्यातील गुरेज शहरातील रहिवासी आहेत.
काश्मीरमधील दोन तरुणांनी हेरगिरी केल्याचा आरोप गिलगिटचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनी केला. ते तरुण भारतीय गुप्तचर संघटना राॅसाठी काम करत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. याविषयी पाकिस्तानी माध्यमांनी वृत्त दिले आहे.
अटकेतील तरुणाच्या कुटुंबियांनी हे वृत्त ऐकून धक्का बसल्याचे सांगितले आहे. कारण गेल्या दोन वर्षापासून त्यामधील तरुण बेपत्ता होता.
पाकिस्तानच्या अटकेत असलेल्या फिरोजचा मोठा भाऊ जहुर अहमद लोन याने ईटीव्ही भारतशी बोलताना म्हटले की, भावाला अटक केल्याने धक्का बसला आहे. माझा भाऊ नोव्हेंबर 2018 मध्ये बेपत्ता झाला होता. त्यावेळी पोलिसात तक्रार नोंदवली होती. मी जम्मूमध्ये होतो. त्यावेळेस माझ्या कुटुंबाने ही माहिती मला दिली होती. फिरोज हा शहापूर गावातील रहिवासी आहे. तो 2018 पासून ग्रामीण विकास विभागात काम करत होता. त्याचे वडील शेतकरी आहेत. त्याला तीन भाऊ आणि सहा बहिणी आहेत. या प्रकरणाबाबत बोलताना सैन्यदल आणि पोलीस अधिकाऱ्यांनी वस्तूस्थितीची माहिती घेत असल्याचे सांगितले. काश्मीरचे पोलीस महासंचालक विजय कुमार म्हणाले, त्यांच्या अटकेबाबत आणि दाव्याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. वस्थूस्थिती कळाल्यानंतर माहिती देऊ, असे सांगितले.
दरम्यान, कोरोनाच्या संकटातही पाकिस्तानने सीमेलगत कुरापती सुरू ठेवल्या आहेत. त्यामुळे भारताने दहशतवाद्यांविरोधात कडक मोहीम सुरू केली आहे.