संगरूर - पंजाबमधील संगरूर येथे घरासमोर खेळताना २ वर्षाचा फतेहवीर १५० फुट खोल बोअरमध्ये पडला होता. जवळपास १०९ तास एनडीआरफच्या दलाने बचावकार्य राबवत त्याला बोअरवेलमधून बाहेर काढले. मात्र, फतेहवीरला चंदीगढमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर मृत घोषित करण्यात आले.
फतेहवीर गुरुवारी ४ वाजण्याचा सुमारास बोअरवेलमध्ये पडला होता. याची माहिती मिळताच एनडीआरएफच्या दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले होते. दलामध्ये २६ जवानांचा समावेश होता. यासोबतच डॉक्टरांची एक टीम आणि रुग्णवाहिकेचीही व्यवस्था करण्यात आली होती. फतेहवीरसाठी बोअरवेलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यात आला होता. फतेहवीरला बाहेर काढण्यासाठी दलाने बोअलवेलच्या समांतर खोदकाम केले. काही भाग कठीण असल्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित असलेल्या मशीनद्वारे खोदकाम करण्यात आले. शनिवारी सकाळी त्याने केलेली हालचाल टिपण्यात आली होती. एनडीआरएफने तब्बल १०९ तास खोदकाम चालू ठेवत त्याला बाहेर काढले. परंतु, फतेहवीरची तब्येत अत्यंत नाजूक झाली होती. त्यामुळे त्याचा रुग्णालयात दाखल करताच मृत्यू झाला.
सोमवारी होता वाढदिवस -
सुखविंदर आणि गगनदीप कौर यांचा फतेहवीर हा एकुलता एक मुलगा होता. दोघांच्या विवाहाला ७ वर्षे झाली आहेत. परंतु, ५ वर्षानंतर त्यांना फतेहवीर हा मुलगा झाला होता. फतेहवीरचा सोमवारी १० जून रोजी दुसरा वाढदिवस होता. परंतु, त्याच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.