हैदराबाद : तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. रचाकोंडा पोलिसांच्या विशेष पथकाने नचाराम पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. या महिलांकडून तब्बल १८ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
रोख रक्कम आणि लाखोंचे मोबाईल जप्त..
एम. रत्नम (३५) आणि एल. नागावेंकटा कृष्णावेणी (३०) अशी या दोघींची नावे आहेत. या दोघीही आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम येथील रहिवासी होत्या. पोलिसांनी या महिलांकडून २८,७०० रुपये रोख रक्कम आणि दोन लाख २८ हजार ७०० रुपये किंमतीचे दोन मोबाईलही जप्त केले आहेत.
पाच हजार रुपये प्रतिकिलो गांजा..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलांनी तेलंगणामध्ये असणाऱ्या स्थानिक तस्करांसोबत व्यापार सुरू केला होता. त्यानंतर हे पदार्थ ते आंध्र प्रदेशमधून अवैधरित्या तेलंगणामध्ये आणत आणि विकत होत्या. हैदराबादमध्ये गांजाची मागणी वाढल्यामुळे त्यांनी अधिक प्रमाणात तो तेलंगणामध्ये आणला होता. त्यांच्याकडे असलेला गांजा हा त्यांनी विशाखापट्टणममधून पाच हजार रुपये प्रतिकिलो दराने विकत घेतल्याचेही या महिलांनी सांगितले.
हेही वाचा : आंध्रप्रदेश-ओडिशा सीमेवर दोन नक्षलवाद्यांचा खात्मा