जयपूर - राजस्थानातील करौली जिल्ह्यात पुजाऱ्याला जिवंत जाळल्याची घटना ताजी असताना पुन्हा मॉब लिंचिंगच्या(झुंडबळी) दोन घटना घडल्या आहेत. सिकर आणि अलवार जिल्ह्यात झुंडबळीत दोघांचा मृत्यू झाला आहे. यातील सिकर जिल्ह्यात घडलेल्या घटनेत ६० वर्षाच्या वृद्धाला दगडांनी ठेचून मारण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर अलवार जिल्ह्यात एका युवकाचा झुंडाने केलेल्या हल्ल्यात जीव गेला आहे.
सिकर शहरातील उद्योग नगर पोलीस ठाणे क्षेत्रात सोमवारी रात्री उशिरा एका वृद्धाची जमावाने दगडाने ठेचून हत्या केली. मृत व्यक्ती चहाचा गाडा चालवत होता. रात्री कच्ची बस्ती येथील काही युवकांशी त्याचा वाद झाल्यानंतर त्यांना दगडाने ठेचून मारण्यात आले. तर अलवार जिल्ह्यात एका तरुणाने युवतीची छेड काढली होती. त्यामुळे काही व्यक्तींनी त्याला बेदम मारहाण केली. त्यात तरुणाचा मृत्यू झाला.
सिकर जिल्ह्यात वृद्धाला ठेचून मारले
मिळालेल्या माहितीनुसार, सिकर शहरातील रामलीला मैदानाजवळ माधव ग्राऊंड आहे. त्याच्या जवळच ओम सिंह यांचा चहाचा गाडा होता. सोमवारी रात्री ओम सिंह आणि त्यांचा मुलगा गाड्यावर काम करत होते. त्यावेळी कच्ची बस्ती येथील काही युवकांनी सिंह याच्या मुलाशी वाद घालायला सुरुवात केली. त्यानंतर जोरदार भांडण झाले. मात्र, युवक तेथून निघून गेले. मात्र, थोड्या वेळाने त्यांनी पुन्हा येऊन दगडफेक केली. यात वृद्ध सिंह यांचा मृत्यू झाला. काही वेळाने पोलीस घटनास्थळी आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
अलवार जिल्हा झुंडबळी घटना
अलवार जिल्ह्यातील कोटकासिक परिसरात एका युवकाने तरुणीची छेड काढली होती. त्यानंतर काही युवकांची छेड काढणाऱ्याला बेदम मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. मृत युवकाच्या कुटुंबीयांनी आरोपींच्या अटकेची मागणी केली, तसेच मृतदेह घेण्यास नकार दिला होता. मात्र, पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर चार तासांनी मृतदेह कुटुंबीयांनी घेतला.