रुद्रपूर - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उत्तराखंडच्या उधमसिंह नगर जिल्ह्यातल्या रुद्रपूर येथील दोन महिला आपल्या तान्हुल्या बाळांना सोडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्तव्य बजावत आहे. यातील एक महिला ही भारतीय सेनेत डॉक्टर असून दुसरी पोलीस विभागात शिपाई आहे. या दोघीही आपल्या लेकरांना घरी सोडून देशसेवेत रुजू झाल्या आहेत. डॉ. रेखा आणि बेबी कार्की अशी या दोघींची नावे आहेत.
कोरोनाचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात येताच सरकारने देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. अजूनही काही नागरिक नियमांचे उल्लंघन करत बाहेर फिरताना दिसत आहेत. तर, दुसरीकडे आर्मीतील डॉ. रेखा या त्यांच्या ७ महिन्यांच्या बाळाला घरी ठेऊन कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी दिवसरात्र काम करत आहेत.
माहितीनुसार, डॉ रेखा सध्या रुद्रपूर आणि उत्तर प्रदेशच्या बॉर्डरवर कार्यरत आहेत. त्या सकाळी ८ वाजता घरातून निघतात. त्यानंतर त्यांच्या बाळाची काळजी त्यांचे पती घेतात. त्या म्हणाल्या, मी माझ्या बाळाला घरात सोडून कोरोनाग्रस्तांसाठी काम करत आहेत. नागरिकांनीही घरातून बाहेर न पडता सरकारची मदत करावी, जेणेकरून कोरोनासारख्या महामारीच्या संकटातून देश मोकळा होऊ शकेल.
तर, दुसरीकडे उत्तराखंडच्या पोलीस विभागात शिपाई पदावर कार्यरत असलेल्या बेबी कार्की यांनाही सहा महिन्यांचे बाळ आहे. त्याही आपल्या बाळाला घरी ठेऊन कर्तव्य बजावत आहेत. देशावर आलेल्या या संकटाशी दोन हात करण्यासाठी नागरिकांनी केंद्र सरकार, राज्य सरकार, देशभरातील डॉक्टर, पोलीस यांना सहकार्य करावे. घरातून बाहेर पडण्याचे टाळावे आणि लॉकडाऊनचे नियम पाळावेत. जेणेकरून कोरोना विषाणूचा खात्मा करता येईल आणि देश या महामारीपासून मुक्त होईल, असे त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.