श्रीनगर- सुरक्षा दलाने एन्काउंटरमध्ये दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे. सुरक्षा दलाने ही कारवाई काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात केल्याचे पोलिसांनी सांगितले.
मेलहोरच्या भागात दहशतवादी लपून बसल्याची सुरक्षा दलाला माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली. ही मोहीम सुरू असताना सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीत सोमवारी सायंकाळी एका दहशतवाद्याचा मृत्यू झाला. तर मंगळवारी रात्री दुसऱ्या दहशतवाद्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत दहशतावाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. सुरक्षा दलाकडून अजून शोध मोहीम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सोमवारी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात केंद्रीय राखीव दलातील एक जवान जखमी झाला आहे. सैन्यदलाच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार काश्मीरमध्ये अजूनही तब्बल 200 दहशतवादी सक्रिय आहेत. त्यांना पाककडून मदत केली जात असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.