चैन्नई - तामिळनाडूमध्ये दोन पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. तामिळ दैनिकासाठी काम करणारे एक पत्रकार आणि तामिळ न्यूज टेलिव्हिजन वाहिनीचे उप-संपादक यांना कोरोनाची बाधा झाली आहे.
एका पत्रकाराला राजीव गांधी शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर दुसर्यावर शासकीय स्टॅन्ली रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या लोकांच्या संबंधित परिसरात निर्जंतुकीकरण करण्याचे काम चालू आहे. तसेत त्यांच्या संपर्कात आलेल्याचा शोध सुरु असल्याचेही आधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्या निर्देशानुसार पत्रकारांचा वैद्यकीय खर्च सरकार करेल, असेही त्यांनी सांगितले.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी गुरुवारी कोरोनासंबधित कर्तव्यावर असताना पत्रकाराचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली.
कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. असे असले तरीही पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन हे आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत.