श्रीनगर : जम्मू-काश्मीर पोलिसांनी सोमवारी सुरक्षा दलांसोबत संयुक्तपणे केलेल्या कारवाईत दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागातून या दहशतवाद्यांना पकडण्यात आले. हे दोघेही जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे.
दोन दहशतवादी ताब्यात..
४२ राष्ट्रीय रायफल, सीआरपीएफ १३० बटालियन आणि अवंतीपोरा पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. दहशतवादी कारवाया करत, दहशतवाद्यांना आसरा देणे, तसेच शस्त्रास्त्रांची तस्कारी करणे या आरोपांखाली दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांची नावे शेझान गुलझार बैघ आणि वसीम-उल-रहमान शेख आहेत, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली.
स्फोटके आणि शस्त्रास्त्रे जप्त..
या दोघांकडून शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. तसेच, या दोघांपैकी एक दहशतवादी पाकिस्तानमध्ये जाऊन, तेथील काही दहशतवादी म्होरक्यांना भेटून परत आला होता, असेही पोलिसांनी सांगितले. या सर्व कारवाईबाबत फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांवर चुकीची माहिती पसरवली जात आहे. प्रांतातील तरुणांना अशा प्रकारे चुकीची माहिती देत, त्यांना भडकावून दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी करण्यात येत असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.
यापूर्वी एकाचा खात्मा..
या दोघांवरही संबंधित कलमांतर्गत अवंतीपोरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. यापूर्वी गेल्या वर्षी २४ डिसेंबरला जैशच्या एका दहशतवाद्याचा बारामुल्ला प्रांतामध्ये खात्मा करण्यात आला होता.
हेही वाचा : नेपाळमध्ये अपहरण झालेली मुले पाटणा पोलिसांच्या ताब्यात