नवी दिल्ली - देशभरात गाजत असलेल्या कमलेश तिवारी हत्याकांडातील दोन प्रमुख आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोइनुद्दीन खुर्शीद पठाण (27) आणि अशफाक हुसैन जाकिर हुसैन शेख (34) अशी या दोन सूत्रधारांची नावे आहेत. या दोघांना गुजरात आणि राजस्थानच्या सीमेजवळ असलेल्या शामलजी गावाजवळून अटक करण्यात आली.
गुजरात दहशतवादी विरोधी पथकाचे (एटीएस) उपमहानिरिक्षक हिमांशू शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या एका पथकाने ही कारवाई केली आहे. या पथकामध्ये गुजरात एटीएसचे पोलीस उपनिरिक्षक बी. एस रोजैया आणि बी. एच. चावडा यांचादेखील समावेश होता.
हे दोन्ही आरोपी सूरतचे रहिवासी आहेत. तिवारी यांच्या हत्येनंतर नेपाळमार्गे पळून जाण्याची या आरोपींची योजना होती. मात्र, जवळचे पैसे संपल्याने, त्यांनी आपल्या घरी संपर्क साधला होता.
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबूली दिला आहे. आरोपींनी तिवारी यांच्यावर आधी गोळ्या झाडल्या होत्या, मात्र निशाणा चुकल्यामुळे त्यांनी चाकूने वार करत तिवारी यांची हत्या केली होती. या दोनही आरोपींना लवकरच उत्तर प्रदेश पोलिसांकडे सोपवण्यात येणार आहे.
हेही वाचा : कमलेश तिवारी हत्या प्रकरण : नागपुरातून एकाला अटक