पणजी - पर्यटकांना अमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या मुरत टँस (वय-47 वर्षे) या तुर्की नागरिकाला शुक्रवारी (दि. 7 फेब्रुवारी) सकाळी गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने हरमल-खालचावाडा येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे 710 ग्रॅम एमडीएमए हा अमली पदार्थ आढळून आला. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत सुमारे 71 लाख रुपये आहे.
शुक्रवारी पहाटे अमली पदार्थ विरोधी पथकाने उत्तर गोव्यातील खालचावाडा-हरमल (ता. पेडणे) येथे भाड्याने खोली घेऊन रहणाऱ्या टँस याला छापा टाकून अटक केली. त्याच्याकडे बेकायदा असलेला 710 ग्रॅम वजनाचा एमडीएमए हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. गोव्यात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना विकण्यासाठी त्याने हा अमली पदार्थ आणला होता. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक अरुण देसाई या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा -विरोधकांच्या अनुपस्थितीत गोवा विधानसभेच्या अधिवेशनाची समाप्ती
मुरत टँस हा माध्यमिक पर्यंत शिक्षण घेतलेला तुर्की नागरिक काहीकाळ तुर्की सैन्यात कमांडो होता. त्यानंतर बेरोजगारीमुळे त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर अमली पदार्थ विकण्यास सुरुवात केली. तो ज्या देशात जात असे तेथे आपल्यासोबत अमली पदार्थ नेण्यास सुरुवात केली. त्याची गोव्याला (भारतात) भेट देण्याची ही दुसरी वेळ आहे. दोन्ही वेळा तो पार्टीत मौजमजा केली. अशा प्रकारे अय्याशी करण्यासाठी तो अमली पदार्थ विक्री करत असतो.
अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदेश वेळीप आणि शशिकांत नाईक, पोलीस उपनिरीक्षक अरुण देसाई, प्रीतेश मडगावकर, रोहन मडगावकर, पोलीस शिपाई संदेश वळवईकर, सुशांत पागी, निकेत नाईक, मंदार नाईक, नितेश मुळगावकर, धिरेंद्र सावंत, रुपेश कांदोळकर, विष्णू हरमलकर, प्रसाद तेली, चंद्रू निगलूर आणि महिला पोलिस शिपाई वेलसिया फर्नांडिस यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा - मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी सादर केला 353.61 कोटींच्या महसूली शिलकीचा अर्थसंकल्प