कोची - शबरीमला मंदिरात प्रवेशासाठी भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई या आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास केरळमध्ये पोहोचल्या आहे. त्यांनी कोचिन विमानतळावरून थेट कोची पोलीस आयुक्तालय गाठत सुरक्षेची मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मागील मंडल-मकरविल्लाकू यात्रेत गदारोळ घातल्याने चर्चेत आलेल्या बिंदु अम्मिनी याही होत्या.
सर्वोच्च न्यायालयाने २८ सप्टेंबर २०१८ रोजी अय्यप्पा मंदिरात दहा ते ५० या वयोगटातील महिलांच्या प्रवेशावर अनेक शतकांपासून असलेली बंदी रद्दबातल ठरवली. त्यानंतर महिलांनी अयप्पा मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भक्तांनी त्यांचा प्रवेश नाकारला. यामुळे तृप्ती देसाई यांनी मंदिरात प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते.
याविषयी बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या, 'शबरीमला मंदिरात मला जाण्यासाठी केरळ सरकार सुरक्षा देऊ शकत नसेल, तर त्यांनी तसं लेखी द्यावं, जर ते लेखी देऊ शकत नसतील तर त्यांनी माझ्या सुरक्षेची काळजी घेत मंदिरात प्रवेश मिळवून द्यावा.'
दरम्यान, १७ नोव्हेंबर २०१८ मध्ये देखील तृप्ती देसाई या शबरीमला मंदिरात प्रवेशासाठी केरळमध्ये दाखल झाल्या होत्या. मात्र, त्यांच्या विरोधात शबरीमला मंदिर प्रथा समर्थकांनी निषेध नोंदवला. यामुळे सुरक्षेच्या कारणावरुन त्यांना कोचिन विमानतळावरून माघारी परतावे लागले होते. विशेष म्हणजे, मुंबई विमातळावर आल्यावरदेखील निषेधकत्यांनी तृप्ती देसाई विरोधात घोषणाबाजी केली होती.
तृप्ती देसाई आणि हाजीअली वाद -
तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यात प्रवेश करण्यासाठी 'हाजी अली सबके लिए' या फोरमची स्थापना करत दर्ग्यात प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. तेव्हा देसाई यांनी दर्ग्यात प्रवेश केल्यास त्यांना चपलेचा प्रसाद देऊ, असा इशारा शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख यांनी दिला होता. मात्र, देसाई यांनी भल्या पहाटे हाजी अली दर्ग्यात प्रवेश मिळवून दर्शन केले होते.
तृप्ती देसाई या मंदिर प्रवेश मुद्द्यांवरून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून परिचित आहेत. त्यांनी शनिशिंगणापूर, त्र्यंबकेश्वर व कोल्हापुरात महिलांना प्रवेश मिळवून दिला आहे.
हेही वाचा - महाराष्ट्रातील 'सत्तानाट्या'वर पडदा पडणार? सर्वोच्च न्यायालय आज जाहीर करणार निकाल
हेही वाचा - संविधानाच्या बांधणीत डॉ. राजेंद्र प्रसादांचे योगदान..