कोलकाता - भारतातून बांगलादेशला अवजड सामान घेऊन निघालेले ७० ट्रकचालक लॉकडाऊनमुळे पश्चिम बंगालमध्ये अडकून पडले आहेत. यामध्ये विविध राज्यातील ट्रक चालक आहेत. त्यांना लॉकडाऊनमुळे पुढेही जाता आले नाही, आणि माघारी सुद्धा येता आले नाही. लॉकडाऊन सुरू होऊन एक महिना उलटून गेला आहे. त्यामुळे या वाहनचालकांच्या कुटुंबीयांचे पैशाविना हाल होत आहे.
आम्ही अडकून पडलो आहे, यापेक्षा जास्त काळजी आम्हाला कुटुंबीयांची आहे. आम्ही घरी पैसे पाठवू शकत नाही. त्यांची चिंता आम्हाला सतावत आहे. यातील बहुसंख्य ट्रक ड्रायव्हर पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा आणि नागालँडचे आहेत. पश्चिम बंगालमधील चकदहा जिल्ह्यामध्ये सर्वजण अडकून पडले आहेत, तेथे त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
स्थानिक आमदार रतन घोष यांनी वाहनचालकांची जाऊन चौकशी केली. तसेच त्यांना गरजेचे साहित्यही दिले. अडकून पडलेल्या ट्रक चालकांची हाल मी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सांगणार असल्याचे घोष म्हणाले. या ट्रक चालकांची वाहतूक कंपनीही त्यांचे फोन उचलत नाही, त्यामुळे चालक असहाय्य झाले आहेत.
बलराज सिंह नावाच्या चालकाने सांगितले, की, मुलांच्या शाळेचे शुल्क भरण्यासाठी माझ्या कुटुंबीयांवर शाळा प्रशासनाकडून दबाव आणला जात आहे. मात्र, मी पश्चिम बंगालमध्ये अडकून पडलो आहे. एक महिना झाला काही कमाई नसताना आम्ही येथे अडकून पडलो आहे.