मुंबई - टेलिव्हिजन टीआरपीमध्ये फेरफार होत असल्याचा घोटाळा उघड झाल्यानंतर 'ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल(बार्क)' ने तीन महिन्यांसाठी टीआरपी रेटिंगची मोजणी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व भाषांसाठी हा निर्णय लागू असल्याने पुढील तीन महिने आता वाहिन्यांचा टीआरपी मिळणार नाही.
बार्क ही संस्था देशातील वाहिन्यांचा टीआरपी मोजण्याचे काम करते. या पद्धीतीचा आता संस्थेकडून आढावा घेण्यात येणार आहे. मोजणीत अचूकता येण्यासाठी सांख्यिकी पद्धतीत बार्क सुधारणा करणार आहे. त्यासाठी १२ आठवड्यांसाठी टीआरपी मोजण्यात येणार नाही, अशी अधिकृत माहिती बार्कने दिली. टीआरपी घोटाळा सुरू झाल्यानंतर आत्तापर्यंत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्यासंदर्भात विशाल भंडारी (20), शिरीष शेट्टी (44), नारायण शर्मा (47), आणि बोंपेली राव मिस्त्री अशा चार आरोपींना अटक केली होती. या आरोपींच्या पोलीस चौकशीमध्ये बऱ्याच गोष्टी समोर येणार आहेत. जवळपास 32 हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या भारतातील वाहिन्यांच्या टीआरपी घोटाळ्या यासंदर्भात आणखी मोठे खुलासे व्हायचे असल्याचे मुंबई पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आले. त्यानुसार न्यायालयाने या चार आरोपींना 13 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या प्रकरणाची संसदीय समितीनेही दखल घेतली आहे.
हंसा रिसर्च ग्रुपमध्ये रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या विशाल भंडारी या आरोपीची मुंबई पोलिसांनी चौकशी केली आहे. त्याने मुंबईतील कांदिवली परिसरामध्ये पाच व्यक्तींच्या घरांमध्ये बॅरोमीटर लावल्याचे सांगितले. हे बॅरोमीटर लावत असताना त्याने एका विशिष्ट वाहिनीला दिवसभरात दोन तास चालू ठेवण्यास सांगितले. यासाठी विशाल भंडारी हा संबंधित लोकांना दर महिन्याला 400 रुपये देत होता, अशी माहिती पुढे आली आहे.