अलवर - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. सध्या देशातही दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे. त्यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशातच सर्व कार्यालये, शाळा, कंपन्या बंद असून सर्वांना घरातून काम करण्याची वेळ आली आहे. दरम्यान, आता शाळा बंद असल्यामुळे ऑनलाईन क्लास सुरू करण्यात आले आहेत. मात्र, या क्लासचा विपरित परिणाम विद्यार्थ्यांवर झालेला दिसत आहे.
सध्या कोरोनामुळे देशात लॉकडाऊन पार्ट 3 येत्या 17 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद आहे. शाळा, महाविद्यालयांनाही सुट्ट्या देण्यात आल्या असून शाळांनी फी घेऊ नये, असे आदेशही सरकारने काढले होते. मात्र, काही ठिकाणी मुजोर संस्थाचालक फी आकारणी करत असल्याचे चित्र होते.
दरम्यान, कोरोनाचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये यासाठी खासगीसोबतच सरकारी शाळांनी ऑनलाईन क्लास सुरू केले आहेत. मात्र, या ऑनलाईन क्लासमुळे विद्यार्थ्यांना फायदा न होता नुकसानच जास्त होत आहे. तासंतास मोबाईल, लॅपटॉपच्या स्क्रीनवर बघून बघून डोळ्यांचे त्रास होत आहेत. तसेच नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे क्लास सुरू असताना मध्येच ऑडिओ, व्हिडिओ बंद होत असल्यामुळे याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.
दरम्यान, ऑनलाईन क्लास बंद करण्याची मागणी आता विद्यार्थी आणि पालकवर्गातून पुढे येत आहे.