नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची आज ११६वी जयंती. यानिमित्ताने देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी विजयघाट येथील शास्त्रींच्या स्मृतीस्थळाला भेट देत त्यांना आदरांजली वाहिली.
लाल बहादुर शास्त्री हे नम्र आणि ठाम होते. त्यांनी आपली राहणी साधी ठेवली आणि कायम देशहितासाठी काम केले. त्यांच्या जयंतीनिमित्त, त्यांनी देशासाठी केलेल्या कामाबाबत आपण कृतज्ञता व्यक्त करु, अशा आशयाचे ट्विट करत मोदींनी शास्त्रींना आदरांजली वाहिली.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही ट्विटरवरुन शास्त्रींना आदरांजली वाहिली आहे.
शास्त्रींच्या कुटुंबीयांनी आज सकाळी विजय घाटवर असलेल्या शास्त्रीजींच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. यावेळी लाल बहादुर शास्त्रींची दोन्ही मुले- सुनील शास्त्री, अनिल शास्त्री, आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.