मंगळूरू (कर्नाटक) - मंगळुरू शहरातील कोडिकल भागात राहणाऱ्या कृष्णा गोविंदा या व्यवसायिकाने वृक्षप्रेमापोटी स्वत:च्या घरातच एक छोटे जंगल उभे केले आहे. त्यांच्या घराभोवती 300 हून अधिक प्रजातीची झाडे आहेत.
कोडिकल येथे राहयला आल्यानंतर कृष्णा यांना वृक्षरोपणासाठी जागेचा प्रश्न उद्भवला होता. मात्र, घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जागेत त्यांनी बाग फुलवली. अशा प्रकारे घरातच जंगल उभे करणाऱ्या व्यक्तींना मदत करण्याची इच्छा असल्याचे कृष्णा यांनी सांगितले.
कृष्णा गोविंदा यांचे घर खालपासून वरपर्यंत झाडांनी वेढले ले आहे. प्लास्टिकच्या बाटल्या, रंगाचे डबे, बांबू, ट्युब, नारळाच्या कवट्या यामध्ये त्यांनी झाड लावली आहेत. या छोट्याशा जंगलात त्यांनी वेगवेगळी फळे आणि भाजीपालासुद्धा लावला आहे.
किचनमध्ये वापरलेले डबे वाया जाऊ नये या हेतूने त्यामध्येच झाडे लावली. स्वयंपाकातील उरलेल्या पदार्थांचे शेणासोबत मिश्रण करून याचा वापर ते खत म्हणून करतात आणि झाडांच्या मातीत टाकतात.
कृष्णा हे मूळचे केरळचे आहेत. पण, त्यांचा जन्म उडुपी तालुक्यातील कापू या गावात झाला. त्यांचे बालपणही याच ठिकाणी गेले. मागील 35 वर्षांपासून ते गुजरातमध्ये व्यवसाय करत होते. यानंतर स्वेच्छा निवृत्ती घेऊन त्यांनी कर्नाटकात घर बांधले. सध्या ते पत्नीसोबत राहत आहेत. गुजरातमध्येही त्यांच्या घरात अनेक झाडे असल्याचे ते सांगतात. सध्या घरभोवती असणारे जंगल हे फुलपाखरं आणि पक्ष्यांसाठी हक्काचे घर झाले आहे.
कुंड्यांमध्येही फळे आणि भाज्यांची चांगल्या प्रकारे लागवड करता येते, असे कृष्णा यांनी सांगितले. सध्या या बागेत विविध प्रजातीची फुलपाखरं आणि पक्षी आढळतात. मनुष्याने पर्यावरणाचा ऱ्हास केला आहे. पण, कृष्णा यांनी घरातच जंगल उभे करून संपूर्ण आयुष्य वृक्ष संवर्धनासाठी कामी लावले.