नवी दिल्ली - शुक्रवारी कोझिकोड विमानतळावर अपघात झालेल्या एअरइंडिया एक्सप्रेसच्या विमानाचे ब्लॅक बॉक्स काही तासानंतर दिल्लीला आणण्यात आले. त्यांना डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एविएशन (DGCA) प्रयोगशाळेतील संचालक जनरल डॉ. अनिल कुमार यांच्याकडे परीक्षणासाठी सोपवण्यात आले. या ब्लॅक बॉक्सेसद्वारे या अपघाताची पूर्ण व निष्पक्षपाती चौकशी केली जाईल, आणि त्यानंतरच नेमके काय घडले हे सांगता येईल, असे कुमार म्हणाले.
‘लवकरच आमच्याकडे असलेल्या ब्लॅक बॉक्समधून सर्व 'ट्रान्स्क्रिप्ट' मिळतील. याशिवाय, आम्ही बोईंग कंपनीशी ही विमानातील मूळ उपकरणे तपासण्याविषयी तसेच, दोषांची तपासणी करण्याविषयी बोलणार आहोत. या प्रकरणी कसून निष्पक्षपाती चौकशी करण्यात येईल. यानंतरच नेमके काय घडले हे सांगता येईल,’ असे ते म्हणाले.
‘हा अपघात दुर्दैवी होता. या प्रकरणी चौकशी सुरू झाली आहे. एअरक्राफ्ट अॅक्सीडेंट इन्वेस्टीगेशन ब्युरो (AAIB) ही स्वतंत्र संस्था या प्रकरणी तपास करणार आहे. आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन संस्थेच्या (ICAO) मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही तपासणी होईल. प्राथमिक अहवालानुसार, विमान धावपट्टीवर उतरताना हलका पाऊस पडला होता. याच्यामुळे विमानाचा जमिनीला स्पर्श होताच ते घसरले आणि दहा फूट खाली गेले. या प्रकरणी, अनेक बाबींचा तपास करावा लागणार आहे. यामध्ये विमान कोसळण्याच्या कारणाचाही तपास केला जाईल, यात विमान, विमानतळ, मानवी चुका आणि हवामान या सर्व बाबींचा समावेश असेल,’ असे कुमार यांनी सांगितले.
या अपघातात दोन वैमानिकांसह 18 जणांना जीव गमवावा लागला. तर, चार कॅबिन क्रू सदस्य सुरक्षित होते, असे एअर इंडिया एक्स्प्रेस निवेदनात म्हटले आहे. या विमानात 10 अर्भकांसह एकूण 190 प्रवासी होते.