पणजी - काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेले गोव्यातील आमदार गुरुवारी पक्षाध्यक्षांची भेट घेऊन गोव्यात परतले. मात्र, त्यांच्यासोबत असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज संध्याकाळी 4 वाजता खाण व्यवसायासंदर्भात दिल्लीत केंद्रीय खनिजकर्म मंत्री आणि पक्षाध्यक्षांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे मंत्रीमंडळ फेरबदल आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी शनिवारी (दि.13) दुपारी होण्याची शक्यता आहे.
बुधवारी गोव्यातील 10 काँग्रेस आमदारांचा गट भाजपत विलीन झाला होता. त्यानंतर मध्यरात्री मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपसभापती मायकल लोबो, संघटन मंत्री सतीश धोंड यांच्यासह ते पक्षाध्यक्षांना भेटण्यासाठी दिल्लीत गेले होते. गुरूवारी भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. तर रात्री उशिरा पक्षाध्यक्ष अमित शाह यांचीही या आमदारांनी भेट घेतली. यानंतर ते आज सकाळी गोव्यात दाखल झाले.
यावेळी माध्यमांशी बोलताना उपसभापती मायकल लोबो म्हणाले, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय योग्यच आहे. मुख्यमंत्र्यांना कोणीही गृहित धरू नये. शपथविधी सोहळा शनिवारी होईल.
तर बाबू कवळेकर म्हणाले, आम्ही गुरुवारी भाजपाध्यक्षांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी चर्चाही केली. यापुढील निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही त्यांनी सांगितले.