- चंदीगड - राष्ट्रपती देशातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत, असे वक्तव्य पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी केले आहे. केंद्रीय कृषी कायद्याविरोधात पंजाबने तीन विधेयके मंजूर केली आहेत. राज्यातील शेतकऱ्यांचे केंद्रीय कृषी कायद्यामुळे नुकसान होईल, असे म्हणत अमरिंदर सिंह यांनी ही विधेयके मांडली होती. त्याला भाजप वगळता सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला.
सविस्तर वाचा- राष्ट्रपती देशातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत - अमरिंदर सिंह
- मुंबई- राज्यात आज कोरोनाचे २३ हजार ३७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे कोरोनावर मात करून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा १४ लाख १५ हजार ६७९ वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.५१ टक्के इतके आहे. राज्यात आज ८ हजार १४२ कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊन १ लाख ५८ हजार ८५२ एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
सविस्तर वाचा- राज्यात ८ हजार १४२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, २१३ रुग्णांचा मृत्यू
- औरंगाबाद - नाथाभाऊंनी राजीनामा देणे दुर्दैवी आहे. पक्ष सोडताना कोणालातरी व्हिलन करायचे असते, त्यांनी मला व्हिलन केले. त्यांनी मांडलेली बाजू ते अर्धसत्य आहे. आज त्याच्यावर बोलणार नाही. वेळ आले की बोलेल, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याबाबत दिली.
सविस्तर वाचा- 'खडसेंना पक्ष सोडायचाच होता, जाताना मला व्हिलन केलं'
- जालना - भारतीय जनता पक्षाने जे पेरले ते आता उगवत आहे. मागील पाच वर्षामध्ये या पक्षाने भरती सुरू केली होती. आता त्याच पक्षाला उतरती कळा सुरू झाली आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. खडसेंप्रमाणेच भारतीय जनता पक्षाचे अजून काही दिग्गज नेते पक्षांतर करतील, कारण ते भारतीय जनता पक्षावर नाराज आहेत आणि हे नेते आपापल्या बुद्धिमत्तेप्रमाणे निर्णय घेऊन इतर पक्षांमध्ये जातील. पंकजा मुंडेच नव्हे तर शिवसेनेची दारे सर्वांसाठी उघडी आहेत. मग त्या पंकजा मुंडे असो किंवा इतर कोणी जे कोणी येईल त्यांचे पक्षामध्ये स्वागतच आहे, असेही खोतकर म्हणाले.
सविस्तर वाचा- 'पंकजाच नव्हे तर सर्वांसाठीच शिवसेनेची दारं खुली'
- श्रीनगर - नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज (बुधवार) पाच तास चौकशी केली. जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनमध्ये (जेकेसीए) कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला असून २०१८ पासून त्यांची चौकशी सुरू आहे. ८३ वर्षीय अब्दुल्ला यांची याआधी १९ ऑक्टोबरला (सोमवार) ईडीने सहा तास चौकशी केली होती.
सविस्तर वाचा- JKCA scam : फारुख अब्दुल्ला यांची ईडीकडून पाच तास चौकशी
- अमरावती- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील सर्व आभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा कालपासून (२० ऑक्टोबर) सुरू झाल्या होत्या. या परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे. नियोजन शून्य असणाऱ्या विद्यापीठाचे काम रामभरोसे असल्याची ओरड आता विद्यार्थी आणि पालक करीत आहेत.
सविस्तर वाचा- अंतिम वर्षाच्या परीक्षा स्थगित; अमरावती विद्यापीठाच्या नियोजनावर पालक-विद्यार्थी नाराज
- मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा जवळचा साथीदार म्हणून ओळखल्या जाणार्या मृत इक्बाल मिर्चीच्या संपत्तीवर ईडीने पुन्हा एकदा कारवाई केली आहे. ही कारवाई इक्बाल मिर्ची याच्या कुटुंबीयांच्या नावावर पाचगणी येथे असलेला सिनेमा हॉल, याबरोबरच मुंबईत असलेले हॉटेल, फार्म हाऊस, दोन बंगले अशा 7 ठिकाणी करण्यात आली आहे. येथे असलेली 22 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.
सविस्तर वाचा- इक्बाल मिर्चीच्या 22 कोटी रुपयांच्या संपत्तीवर ईडीची कारवाई
- उस्मानाबाद - भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खडसे यांचे महाविकास आघाडीमध्ये स्वागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे आज उस्मानाबाद येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर प्रतिक्रिया दिली.
सविस्तर वाचा- खडसेंचे महाविकास आघाडीत स्वागत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- मुंबई - बेस्ट उपक्रम आर्थिक तोट्यात आहे. मुंबई महापालिकेने आणि राज्य सरकारने बेस्टला आर्थिक मदत करण्याची मागणी केली जात आहे. मुंबई महापालिकेने बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी आतापर्यंत २ हजार १२६ कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. पालिका बेस्टला आणखी १ हजार कोटी रुपये देणार असून त्यापैकी ६०० कोटी रुपयांची मदत पालिकेने दिली आहे. याबाबतचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
सविस्तर वाचा- बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी पालिकेची मदत, आणखी १ हजार कोटी देणार
- नवी दिल्ली - बेरोजगारीचे प्रमाण वाढत असताना चिंताजनक बातमी समोर आली आहे. येत्या पाच वर्षापर्यंत ८५ कोटी लोकांचे रोजगार मशीन घेणार आहेत. ही माहिती जागतिक आर्थिक मंचाच्या अहवालात देण्यात आली आहे.
सविस्तर वाचा- चिंताजनक! येत्या पाच वर्षात मशिन ८५ कोटी लोकांचे रोजगार हिरावून घेणार